Friday, 20 January 2017

नर्मदा परिक्रमा भाग 25to42


💐  जय गुरुदेव 💐
क्रमश:--- २५
पहाटे ३.०० वाजता उठलो मुख मार्जन करून ध्यानास बसलो बघा मी किती भाग्यवान आहे परिक्रमेच्या आधी म्हाराजांन बरोबर ध्यानास बसायचो परिक्रमेत स्वामीं बरोबर ध्यानास बसतो असो
     ध्यान झाले बादली घेऊन नर्मदा किनारी जाऊन स्नान संध्या केली नंतर वर येऊन नर्मदा पूजन केले व पुढे निघण्याची तयारी केली सर्व आवरा आवर करून श्री सियाराम  महाराजांना नमस्कार केला त्यांनी मला व स्वामींना चहा दिला चहा घेऊन आम्ही पुढे निघालो मी पुढे व काही अंतरावर पाठीमागे स्वामी मनात अजपा जप  चालू होता  चालता चालता रात्री स्वामी बोलले तए आठवत होत स्वामींची समजवण्याची पद्धत फार वेगळी आहे  भाषा उच्च व उदाहरण अतिशय सोपी चेहऱ्यावर भाव अतिशय शांत व मातृतुल्य भाव  खरोखर  मी भाग्यवान  कि दोन्ही सद्गुरू हे माझ्यावर  मातृवत प्रेम करणारे मिळाले
     चालत चालत आंम्ही ससावड गाव पार करून  लेपा गावाजवळ आलो माध्यानाची  वेळ होती म्हणून एका झाडाखाली थांबलो त्यांनी विचारले भोजन करायचे का मी नाही म्हणालो मला खरं हासू आले होते कारण तेथे जवळ घरे नव्हती  आमच्या जवळ काहीही नव्हते  म जेवणार काय त्यांनी ओळखले व ते हि हसले  मी त्यांना सांगितले स्वामी आपण मृत्यू व आत्मा ह्या विषयी सांगत होतात पण तो विषय  आपला अर्धवटच  राहिला तर कृपा करून आपली इच्छा असल्यास त्यावर बोलावे त्यांनी सांगितले एक लक्षात ठेव दिवसा फक्त चालणे व जप साधना करणे रात्री झोपण्याआगोदर तुझ्या शंका असतील त्यावर व आध्यात्म चर्चा
दोन तास तेथे झाडाखाली विश्राती घेऊन दुपारी पुढे निघालो
नंतर पुढे लेपा गाव आले लेपा गावाच्या पुढे  वेदा नदी मैय्यास मिळाली आहे तिथे वेदा संगम आहे त्या संगम किनाऱ्यावर। शिव मंदिर आहे आम्ही त्या मंदिरात गेलो तेथे कोणीही नव्हते स्वामी म्हणाले आज आपण येथे राहू
  आम्ही शिव मंदिरात राहण्याचे ठरवले येथे काय घडले उद्या बघू
क्रमश
गुरुकृपा काय काय करेल हे खरोखर  आकलन शक्तीच्या पलीकडे आहे आपण फक्त स्थिर होऊन पहाणे

💐 जय गुरुदेव 💐
🌹 क्रमश:--२६
    वेदा संगमावरील शिव मंदिरात आम्ही ४.०० वाजता येऊन पोहचलो तेथे कोणी नव्हते मी स्वामींना म्हणालो इथे कोणीच नाही जवळपास आश्रम किंवा घरे नाहीत आपण दुपारी पण भोजन केले नाही आता पण उपवास का
    स्वामी हसले म्हणाले अरे चिंता का करतोस मैय्यानि इथे काही ठेवले असेल बघ शोध मी मी शोधण्यास सुरवात केली तेव्हा शिव लिंगा मागे एका पिशवीत थोडासा आटा, तांदूळ,डाळ, दोन बटाटे व मीठ दोन मिरच्या होत्या तेथे तवा पण होता
मी ते स्वामींसमोर आणले ह्याच काय करू
स्वामी म्हणाले दगडाची चूल बनव काड्या गोळा करून आन आट्याचे रोडगे करून तव्यावर भाज तुझ्याकडे भांड आहे त्यात डाळ तांदूळ घालून खिचडी सारखं कर दोन्ही बटाटे चुलीत भाज नंतर कुस्करून त्यात मीठ मिरची घाल झाली चटणी सर्व शिध्याच बनव कारण अजून एक माताराम परिक्रमा करतेय ती येईल मला आश्चर्य वाटले ते म्हणाले काळजी नको करू ती फक्त आजची रात्र आपल्याबरोबर असेल उद्या ती तिच्या मार्गाने जाईल तीच आपल्याला बरोबर ठेवणार नाही असो
    स्वामींनी सांगितले तसा सर्व स्वयंपाक केला बघा हळद,तेल,मसाले,काहीही नाही
ह्यालाच म्हणतात भुकेला कोंडा व निजायल धोंडा असं बनवताना माझ्या मनात आले सर्व झाकून ठेवले  स्वामींना सांगितले मी स्नानाला जातो ते म्हणाले मी स्नान करतो मी म्हणालो आपण दोघेही गेल्यावर इथे कोण कुत्रा किंवा मांजर येऊन खाल्ले तर तुम्ही जाऊन या मी नंतर जाईन त म्हणाले नाही तू पण जा अरे खाल्लं तर खाल्लं त्याच्या करता बनवलं असं समज
    थोडस  अनिच्छेने मी निघालो मंदिराच्या खाली उजव्या बाजूस मी तर डाव्या बाजूस ते गेले थोडं पुढे एका दगडावर मी पंचा धोतर व भस्माची डबी ठेवली व पुढे गेलो एका दगडावर बसून तुंब्याने ( कमंडलू ) स्नान केले खुप आरामदायी वाटले तुंबा भरून पाठीमागे आलो आणि जे बघितले त्यांनी माझया तोंडातून शब्दच फुटेना
    कारण माझया पंचावर एक नाग चर पाच वेटोळे घालून फणा काढून बसलेला काय करावे कळेना स्वताला सावरले त्याला नमस्कार केला पुढे जायची हिम्मत होईना  काहीच सुचत नव्हते बरं पंचा व भस्म सोडून जाऊ तर मंदिरात जायला तोच रस्ता  काहीच कळेना काय करावे
   तेवढ्यात बाजूनी एक पांढरी साडी नेसलेली हातात काठी असलेली  व खाद्यांवर झोळी अश्या वेशात एक माताराम आली मला म्हणाली नर्मदे हर महाराज अहो का थांबला केवाचे थांबलाय मी तुकडून येताना बघतेय  मी खुणेने फक्त नाग दाखवला
  ती माताराम हसली म्हणाली परिक्रमा करताय आणि ह्याला घाबरलात अरे हा तर मैय्याचा वडिलांचा लाडका म्हणजे मैय्याचा भाऊ आणि त्याला घाबरलात तरी  माझ्या तोंडातून शब्द निघेना त्यांनी सर्व सामान ठेवले त्या पुढे झाल्या त्यांनी त्याला नमस्कार केला व हातानी पकडून समोरच्या झाडीत सोडला मी पहातच राहिलो त्यांनी माझया तोंडावर पाणी मारले मी भानावर आलो
    माताजींनी विचारले इथे राहण्यासाठी काही आहे का मी म्हणालो तेथे शिव मंदिर आहे आम्ही तेथे उतरलोय त्या म्हणाल्या कोण कोण आहे किती मूर्ती आहे ( मूर्ती हा शब्द इकडे परिक्रमावासीयांना उद्देशून वापरतात ) मी म्हणालो आम्ही दोघेच गुरु शिष्य मी व माझे सद्गुरू
त्या म्हणाल्या ठीक आहे तुम्ही पुढे व्हा मी स्नान व पूजन करून येते
मी मंदिरात आलो स्वामी आधीच आले होते अजूनही मी घाबरलेलाच होतो व त्या मातारामांचे आश्चर्य वाटत होते स्वामींनी ओळखले अरे जे घडायचे ते घडून गेले कितीवेळ भीती राहणार आहे पूजा आरती कर भीती जाईल मी पूजा आरती केली  अष्टक म्हटले
तो पर्यत त्या माताराम आल्या त्यांनी आल्या आल्या नर्मदेहर म्हणून आरोळी दिली सर्व सामान बाजूला ठेवलं शंकरास नमस्कार केला स्वामींजवळ आल्या
माझा परिचय मी परिक्रमावाशी एवढाच देऊ शकते आज संध्याकाळ झाली आहे म्हणून मी इथे थांबते उद्या माझ्या मार्गाने मी जाईन स्वामी फक्त तथास्तु म्हणाले माझया बोलण्याचं प्रश्नच नव्हता
स्वामींनी विचारले भोजन करणार का त्यांनी हो म्हटले आंम्ही तिघे जण जेवलो बघा नंतर मी ती दोन तीन भांडी घासली जेवतानासुद्धा माझ्या डोळ्यासमोरून नागाचा प्रसंग जात नव्हता
मी खरोखर भीतीने गप्प झालो होतो भांडी घासून मी स्वामींसमोर बसलो
माताराम पण होत्या
स्वामी म्हणाले तू घाबरलेला आहेस पण लक्षात घे हे तुझ्या प्रारब्धात होते म्हणून तू तिकडे एकटा गेलास आज मी तुला प्रारब्धा विषयी सांगतो
आणि ते बोलू लागले
क्रमश:--
इथे अजून बरेच काही घडले ते उद्या बघू

💐  जय गुरुदेव 💐
🌹क्रमश:---२७
मी स्वामींच्या समोर बसलो होतो व थोडेसे दूर त्या माताराम बसल्या होत्या त्यांना सर्व ऐकू जात होते व त्यांचे लक्ष सुद्धा इकडेच होते
   स्वामी म्हणाले प्रारब्धावर मी तू ला आधी एक गोस्ट सांगतो नीट एक
    एक महाराज होते ते आयुष्यभर ईश्वर नामसमरण करीत असत कालपरत्वे ते वृद्धवस्थेस पोहचले शरीर क्षीण झाले त्यांना कुठलीही क्रिया करण्यास मदत लागे त्यांच्या शेजारील खोलीत त्यांचे काही शिष्य रहात होते महाराजाना नेईसर्गिक विधी साठी शिषयांना बोलवावे लागे  नंतर नंतर शिष्य कंटाळा करू लागले व यायला उशीर करू लागले
  काही दिवसानंतर त्यांनी विधी करता शिषयांना हाक मारली पहिल्या हाकेतच एक तरुण मुलगा आला त्यानि सर्व सेवा केली असे दोन तीन वेळा घडले एका हाकेतच तो मुलगा येऊन सेवा करू लागला महाराजाना शंका आली इतके दिवस डॉ तीन हाक मारून सुद्धा कोणी येत नव्हते आता हा पहिल्या हाकेतच येतोय हा कोण आहे तेंव्हा त्यांनी त्या मुलाचा हात धरला व विचारले तू कोण रे तेंव्हा त्या मुलाने मूळ स्वरूप प्रगट केले तर ते त्यांचे सद्गुरू होते त्यांनी सद्गुरुंना नमस्कार केला व म्हणाले माझ्या करता आपणास एवढा त्रास
   तेंव्हा ते म्हणाले हे तुझे प्रारब्ध भोग आहे तू भोगतोयस  तेंव्हा महाराज म्हणाले आपली कृपा कमी आहे का कि माझे प्रारब्ध भोग जास्त आहेत की तुमच्या कृपेने संपत नाही तेंव्हा त्यांचे सद्गुरु म्हणाले मी तुझे प्रारब्ध भोग ह्या जन्मात नष्ट करू शकतो पण तू ते भोगण्याकरता पुन्हा जन्म घ्यावा लागेल मला ते नको आहे मला तुला मोक्ष मिळवून द्यायचा आहे म्हणून मी तुला ते भोगण्यास मदत करून शक्ती देत आहे
  त्यांनी सद्गुरुंना विचारले असे कोणते भोग आहेत  तेंव्हा सद्गुरु म्हणाले तीन प्रकारचे भोग असतात नीट एक
🌸 मंद प्रारब्ध भोग
 ईश्वर आराधना सद्गुरू सेवा व जप केल्याने हा भोग नाहीसा होतो
🌸 तीव्र प्रारब्ध भोग
अनेक संतांच्या संगतीने तिर्थाट्टंन केल्याने धर्माचरण दान  केल्याने हा भोग नष्ट होतो
🌸तीव्रत्तम  भोग
हा प्राब्धभोग भोगावाच लागतो
पण सद्गुरुंशी जो साधक एकनिष्ठ असतो त्याला हा भोग भोगण्याकरता सद्गुरु स्वतः त्याच्या बरोबर राहून बोग भोगण्यास साहाय्य करतो जसे मी तुला साहाय्य करतोय हे ऐकल्यावर आपला सद्गुरु आपली सेवा करतोय ते सुद्धा आपले भोग भोगण्या करता त्या महाराजांना भरून आले व त्यांच्या डोळ्यात पाणी आले
  स्वामी म्हणाले काही भोग चांगले सुद्धा असतात पण मनुष्याला कळत नाही व तो उगाचच घाबरतो जसे तुला नागाने दर्शन दिले हे चांगले पण तू घाबरलास हे एकूण मला परत तो प्रसंग आठवला व अंग शहारले ते पाहून त्या माताजी हसल्या व स्वामींना  म्हणाल्या अजून तुमच्या शिष्य घाबरलेलाच आहे
   मग त्या माझायजवळ आल्या व म्हणाल्या घाबरू नका मि तुम्हांला मी उद्या नागाची साधना देते जेणे करून तुम्हाला नागाविषयी सर्व ज्ञात होईल मी तुम्हाला गुरुमंत्र देणार नाही फक्त साधना देईन त्याचे नियम पण आहेत ते सांगेन  तुमच्या सद्गुरुनची परवानगी घ्या व सांगा
क्रमश:
उद्या नियम बघू

💐  जय  गुरुदेव  💐
🌹भाग :--- २८
माताजींनी  नियम सांगायला सुरुवात केली साधना जरा कठीण आहे पण साधकाला साधनेत कुठलीही गोष्ट कठीण वाटता कामा नये
🌻 मी जो मंत्र देईन तो रोज सकाळ दुपार व संध्याकाळ  स्नान संध्या करून एक माल जपणे
🌻 हे अनुष्ठान ३१ दिवस करायचे
ह्या ३१ दिवसात तेल ,तिखट ,मीठ, साखर ,भात ,भाजी, वरण, सर्व वर्ज्य फक्त दूध चपाती दुधात साखर व चपातीत मीठ नाही
जेव्हा दूध मिळणार नाही तेव्हा चपाती नुसती किव्हा पाण्याबरोबर ग्रहण करणे चपाती न मिळाल्यास नुसते दूध पिणे दोन्हीही न मिळाल्यास उपवास करणे खूप कठीण होत कारण मी भ्रमणात होतो इथे दूध चपाती मिळेल कि नाही भरवसा नाही कारण इकडे चहा सुद्धा कधी कधी कोरा मिळतो असो
🌻 जपाच्या वेळेस अंगात उष्णता निर्माण होईल घसा शुष्क होईल पण जपमाळ पूर्ण होईपर्यंत पाणी प्यायचे  नाही
असे नियम सांगून त्यांनी दोन्ही सद्गुरुंची परवानगी घेण्यास सांगितले
मी विचार करायला लागलो परिक्रमा सुरु होऊन आजचा पाचवा दिवस पाच दिवसात  अनपेक्षित इतक्या घटना खरोखर मैय्या व सद्गुरुंच्या मनात काय आहे काहीच कळत नाही पण एक नक्की मैय्या  परिक्रमेत वेगवेगळे अनुभव येतात हे प्रत्ययास येऊ लागले असो
मी स्वामींना विचारले साधना घेऊ का ते हसले म्हणाले आरे तू इकडे साधनेसाठीच आला आहेस त्यामुळे ईश्वरी कोणतीही साधना करायला हरकत नाही मग मी ठरवले सकाळी ध्यानात महाराजाचे स्मरण करून त्यांना विचारू त्यांचा नकार असेल तर आपोआप माताजी मंत्र देणार नाहीत असो
नंतर निद्राधीन झालो तर दृष्टांतात महाराज म्हणाले आपल्या सद्गुरुंचे अनुग्रह नियम पाळून अन्य कुठलीही साधना करणे शक्य होत असेल तर जरूर करावी पण कोणतीही साधना अपूर्ण करू नये म्हणजेच साधना सुरु करण्याआधी आपल्याला शक्य आहे का हा  विचार करावा नियम पाळता येतील का ह्या सगळ्याचा विचार करून ठरव  जाग आली तसे महाराजांचे म्हणणे पण बरोबर होते कारण भोजना बद्दल जो नियम होता तो कठीण होता कारण मी परिक्रमेत कधी कुठे असेंन सांगणे कठीण आहे व दुध मिळणं एवढं सोपं नाही पण ह्या पाच दिवसात घडणाऱ्या घटना वरून हे नक्की मैय्या किनारी माझी साधना खुप होईल याची खात्री आली
उठलो स्वामी बरोबर ध्यान करून नंतर स्नानासाठी गेलो कालच्या संध्याकाळचा प्रसंग आठवला पण न भिता गेलो स्नान संध्या केली परत  मंदिरात आल्यावर नर्मदा पूजन अष्टक म्हटले स्वामी म्हणाले शंकराला अभिषेक कर म शंकरास रुद्र अभिषेक केला त्या माताराम सुद्धा अभिषेकास बसून मंत्र म्हणत होत्या नंतर त्यांना सांगितले मला साधना द्या त्यांनीं विचारले नियम पाळाल न तेवढ्यात स्वामी म्हणाले अहो तो माझा शिष्य आहे कितीही कठीण प्रसंग आला तरी जिद्दीने साधना पूर्ण करेल मी खात्री देतो मला खरंच भरून आले कारण गुरूंकडून हि मिळालेली शाबसकीच आहे
त्या मातारामांनी मला एक तांब्याचा नाग दिला सर्व नियम पुन्हा सांगितले व तुमच्या मैय्या बरोबर हा नाग ठेवा व ह्याची पण पूजा करा व ह्याचा समोर जप करा असे म्हणून माझया कडून ३१ दिवसांचा साधनेचा संकल्प सोडून घेतला ३१ दिवसानंतर नाग मैय्यात सोडण्यास सांगितले  व नंतर नागाचा मंत्र दिला व त्या निघून गेल्या म स्वामींनी सांगितले आजपासूनच सुरवात कर आपण उशिरा निघू
म मी नागाची पूजा केली व एकाग्र होऊन जप करण्यास सुरुवात केली जरा वेगळेच वाटत होते असो
जप झाल्यावर आवरा आवर करून निघण्यास १०.०० वाजले
 स्वामी म्हणाले रोज एवढा उशीर चालणार नाही उद्या पासून ध्यान झाले की प्रथम नागाची साधना कर नंतर उजडेल मग संध्या व नर्मदा पूजन कर न मग निघू समजले मी हो म्हटलं म्हणजेच उद्या पासून थंडीचा  विचार न करता ४ ते ४.३० ला स्नान करावे लागणार  हे नक्की अजून  काय काय घडेल काय माहिती पण चिंता नाही कारण माझ्या कडून  सर्व करून घ्यायला तिघे जण आहेत १)महाराज,२)स्वामी ,३ ) मैय्या म मला कसली चिंता खरंच आहे न मी भाग्यवान स्वताच्या मनालाच विचारले
क्रमश:
वेदा संगमवरून निघालो बघू पुढे काय होते ते

लेखक श्री वाड फोन नंबर 9503037638

💐  जय  गुरुदेव  💐
🌹 क्रमश:--- २९
१० वाजता वेदा संगम वरून निघालो नेहमी प्रमाणे मी पुढे व स्वामीजी मागे होते माझ्याकडे माझी पिशवी काठी तुंबा होते आज जरा पिशवी जड लागत होती कारण कळेना स्वामींजवळ काही नव्हते त्यांनी आवाज दिला मी थांबलो त्यांनी विचारले सामान जड आहे का मी म्हंटल थोडं जड वाटतंय ते म्हणाले असं कर तुंबा माझ्याकडे दे मी म्हंटल नको राहू द्या ते म्हणे दे रे नाही हो करता त्यांनी तुंबा घेतला आम्ही पुढे चालत राहिलो
माकडखेडा येथे आलो ते म्हणे दुपारचे आपण इथेच थांबू कारण तुला साधना करायची आहे व इथे शिव मंदिर पण आहे मी पण होकार दिला आम्ही थांबलो
     ह्या परिक्रमेतील  एक महत्वाची गोष्ट  सांगतो  बरेच  परिक्रमावाशी होते जे पुढे जात होते थांबत होते पण फक्त नर्मदे हर या शब्दाव्यतिरिक्त कोणीच कोणाशी गप्पा मारणे किंवा  उगाचच चौकशी करणे असले काहीही नव्हते कारण जो तो आप आपली साधना करण्यात व्यस्त  होते  २०१० नंतर मी पाच परिक्रमा केल्या त्या मध्ये चौकशी व गप्पा इतक्या कि साधनेला वेळच मिळत नाही असो
     आम्ही माकडखेडास थांबलो  म मी तेथे स्नान केले संध्या केली व नंतर नागाची पुजा करून एकाग्र होऊन मातारामांनी दिलेला जप केला
    जप चालू असतांना एक वेगळीच अनुभूती येत होती म्हणजे शरीर एकदम जड जड  वाटायचे मधूनच चक्कर येते का असे  वाटायचे  व आजूबाजूला  सुगधं येत असे व जप झाल्यावर थकवा आल्यासारखे वाटत होते सकाळी पण असेच वाटले
स्वामींना विचारावे असे वाटले पण परत ठरवले  दोनच वेळा जप झालाय अजून एक दोन दिवस जाऊ देऊ मग बघू जप झाला थकवा आल्याने थोडा आडवा झालो झोप लागली
     अचानक जाग आली आणि स्वामी दिसले नाही तसा जरा घाबरलो भराभर सगळं आवरलं आणि निघालो चालण्याचा वेग जेव्हढा होता त्याचा पेक्षा मनाचा वेग जास्त होता स्वामी रागावून तर गेले नाहीतन माझी काय चूक झाली अनेक प्रश्न मनात घर करत होते डोळ्यातून पाणी पण येत होते मैय्या कडे बघून स्वामींना भेटवं अशी प्रार्थना करत होतो मनाची अवस्था फार बिकट झाली होती शब्दात वर्णन करणे कठीण आहे रावेरच्या खडक नदीस ते भेटल्यापासून ते आतापर्यत सर्व डोळ्यासमोर येत होते कुठे आपण चुकलो आठवत होत पण काहीच कळत नव्हते स्वताला खुप दोष देत होतो मी का झोपलो स्वताचा खुप राग येत होता काय करावे कळत नव्हते मनात जप चालू होता पाय भराभर पुढे धावत होते रस्त्याबद्दल कळत नव्हते फक्त ओढीने चालणं काय जवळ जवळ धावतच होतो बडगावला आलो एक जण चहा प्यायला बोलवत होते नम्र नकार दिला व त्याला स्वामींचे वर्णन करून विचारले तो म्हणे हो आत्ताच थोडावेळ झाला ती मूर्ती पुढे गेलीय थोडा जीवात जीव आला म्हणजे स्वामी पुढे आहेत म पुन्हा विचार आला मला भेटतील का मन पण किती विचित्र असते काय काय मनात येईल सांगता येत नाही मनात जप चालू होता व डोळ्यात पाणी चालू होते चालण्याचा वेग वाढवत होतो मनात एकच होते स्वामी आजच भेटावे
क्रमश:--
उद्या बघू काय होते
लेखक श्री विश्वास वाड

💐  जय  गुरुदेव  💐
🌹 क्रमश:-- भाग  ३०
बघा  मन किती विचित्र असतं  परिक्रमा सुरु करतांना मी कोणा बरोबर  राहणार नाही आणि आता स्वामी नाही तर मनच स्थिर होत नव्हते असो
     चालत चालत मैय्या किनाऱ्यावरून शालिवाहन  पर्यत आलो आत जाणार तर समोर महादेवापाशी स्वामी बसलेले दिसले खांद्यावरील सामान तसेच टाकून धावत स्वामींपाशी गेलो त्यांच्या पायावर डोकं ठेवले व रडू कोसळले त्या अवस्थेचा फक्त विचार करा त्यांनी उठवले शांत केले म्हणाले तू झोपला होता म तुला कसे उठवणार आणि काय रे गुरूच्या शरीरावर एवढे प्रेम का ? सद्गुरूंला  देहातीत बघायचे नसते  ज्यावेळेस शिष्यास  वाटते सद्गुरू  आपल्या  जवळ नाही म्हणजेच  तो साधनेत कुठेतरी मागे आहे कारण सद्गुरू हे नेहमी मनस्वी साधना करणाऱ्या  साधकाला दिलेल्या मंत्रात म्हणजेच साधकाच्या मनात असतात  म  ते शरीराने दूर असले तरी शिष्याबरोबरच असतात जेव्हा शिष्य  मंत्रापासून दूर असतो तेव्हा सद्गुरू देहाने जरी जवळ असले तरी ते शिष्यापासून दूर असतात म्हणून सांगतो अजपा जप करत रहा म्हणजे  सद्गुरू सदैव जवळ राहतील म  त्यांना शोधायची गरज नाही असो मी म्हणालो तसे नाही स्वामी पण तुम्ही दिसला नाहीत निघून आलात मला वाटले माझे काही चकले का? ह्या विचाराने मी अस्वस्थ होतो कारण परिक्रमेतच नाही भवसागरात गुरु जर रुष्ठ झाले तर त्याला भवसागर पार करणे कठीण असते आणि माझे सर्वस्व सद्गुरू आहेत जसे बालकाची आई त्याचा पासून दूर गेली तर त्या बालकाची  अवस्था न सांगितलेली बरी मी खरं सांगतो स्वामी एकवेळ माझयावर देवता रुष्ठ झाली तर मला चालेल पण माझ्यावर सद्गुरू रुष्ठ झालेत हे मी सहन नाही करू शकणार त्यापेक्षा मी मृत्यू स्विकारींन हे मी त्यांच्या समाधानाकरता नाही बोललो हे खरंच सत्य आहे हे ते जाणत होते त्यांनी माझ्याकडे प्रेमाने बघितले त्यांचे डोळे पण भरून आले असो आंम्ही आज येथेच मुक्काम करायचे ठरवले
   ह्याला शालिवाहन म्हणतात तसे जवळचे गाव नावाडा टोळी आहे पण शककर्ता शालिवाहन इथला म्हणून ह्याला शालिवाहन नाव पडले असं हि म्हणतात की शालीवाहनने येथे तपसाधना केली नक्की माहीत नाही इथे पण शिवमंदिर आहे बघा योग कसा नागाची साधना मिळाल्यापासून  आता तिसऱ्यांदा जप होणार आहे तिन्ही वेळेस शिव मंदिरच भेटले
 आंम्ही शिवमंदिरात राहायचे ठरवले इथेच आश्रम होता स्वामींना विचारले भोजनाचे काय करायचे ते म्हणाले समोरचा आश्रमातले चालेल पण तुला दूध चपाती मिळेल का विचारून ये  मी गेलो तेथिल महाराज  मराठीच होते त्यांना मी साधनेविषयी सांगितले त्यांनी सांगितले काळजी करू नका तुमची व्यवस्था होईल पण पूर्ण परिक्रमेत कस कराल मी म्हटलं ती काळजी सद्गुरुंना असो
    म मी तुंबा व त्यांच्या कडून बादली घेऊन स्नानास गेलो समोरच्या तीरावर मंदिर दिसले काय असेल विचार करत होतो जवळच स्नान करत असलेल्या  महाराजांना विचारले त्यांनी उत्तर दिले ते ऐकून मला माझी चूक कळली
क्रमश:---
उद्या बघू त्यांनी काय  उत्तर दिले
लेखक श्री विश्वास वाड

💐 जय गुरुदेव 💐
क्रमश:----३१
    जवळच एक महाराज स्नान करत होते मी त्यांना विचारले समोर कोणते ठिकाण आहे त्यांनी मला विचारले आप यहा क्या कर रहे हो मी म्हटलं परिक्रमा तो म्हणाला तो वो ठीक करो सामने से क्या लेना देना जब वाहा जायएंगे  तब देख लेना यहा आये हो तो साधना करो इधर उधार मत देखो मी गप्प झालो मी बादली भरून आणली व स्नान करू लागलो त्या महाराजांनी जातांना सांगितले वो महेश्वर है फिर कभी इधर उधार मत देखो अपनी साधना ओर अपनी परिक्रमा इतना हि देखो मी स्नान संध्या केली वर आलो शिव मंदिरात शिवलिंगावर तो नाग ठेऊन मातारामांनी दिलेला जप सुरु केला लागोपाठ तीन वेळेस आलेली अनुभूती परत आली
नंतर मैय्या पूजा आरती अष्टक झाले मग स्वामीना नमस्कार केला भोजनाची घंटा झाली स्वामी व मी भोजनास गेलो प्रथम स्वामींचे भोजन झाले त्यांचे ताट घासले मग ते गेल्यावर मी तेथील म्हाराजांनकडून दूध चपाती घेतली नंतर परत शिव मंदिरापाशी आलो स्वामींच्या झोपण्याकरता सतरंजी चादर मागून घेतली स्वामीचे माझे अंथरून लावून स्वामींपाशी आलो आज ते काय सांगतील बघू
त्यांनी सांगितले तुझे सर्व समतोल आहे कारण तुझे प्रारब्ध ,कर्म व बुद्धी याची तू व्यवस्थित सांगड घालतो आहेस
मी म्हणालो मी समजलो नाही तर वेड्या कोणी प्रारब्ध श्रेष्ठ मानत तर कुणी कर्म तर कुणी बुद्धी  श्रेष्ठ मानत पण  वास्तवात  तिन्ही सारखेच आहे  तिन्ही पैकी कोणी श्रेष्ठ व कनिष्ठ नाही पण मनुष्य  हा भ्रमाचा पुतळा आहे तो वेळेनुसार  एखाद्याची उच्च निचता ठरवतो मी म्हणालो स्वामी अजून जरा  विस्तृत करा ते हसले म्हणे बघ तू या तिघात काय श्रेष्ठ मानतो मी म्हणालो प्रारब्ध  ते म्हणे कस आतां मला सांग तुझया प्रारब्धात दुसरे सद्गुरू होते नागाची साधना मिळणार होती बरोबर मी म्हणालो हो म  ते म्हणाले पण जर तू परिक्रमेस आलाच  नसता तर  तुला हे मिळाले असते का तर तुला बुद्धी झाली परिक्रमेस  येण्याची मग बुद्धी श्रेष्ठ का तर तुला बुद्धी झाली पण तू परिक्रमेला येण्याचे कर्म  केले नसते तर म कर्म श्रेष्ठ का तर अनेक  जणांनी परिक्रमेस  येण्याचे कर्म केले पण त्यांना हे काहीही मिळाले नाही का तर त्यांच्या प्रारब्धात नव्हते मी प्रारब्ध  श्रेष्ठ  का तर पुन्हा तीच सांगड येईल म नक्की काय आहे तर ज्याची  आपल्या सद्गुरुंवर  निष्ठा नाही साधनेवर विश्वास नाही तो ह्या चक्राचा जास्त विचार करतो
आध्यात्म शास्रात सर्वात जास्त महत्व सद्गुरू व साधना यालाच आहे बाकी सर्व शब्द फसवे आहे त्यांनी ह्यावर बरेच विवेचन दिले मी संक्षिप्त सांगितले
क्रमश:----
लेखक श्री विश्वास वाड

💐  जय गुरुदेव 💐
🌹 क्रमश:--भाग ३२
स्वामी प्रारब्ध ,कर्म व बुद्धी हयावर बोलत होते मी ऐकत होतो खरोखर स्वामीच्या मुखात सरस्वती आहे आणि सांगण्याचीं पद्धत विलक्षण होती त्यामुळे लक्ष किंचित सुद्धा विचलित होत नाही खरी एकरूपता याला म्हणतात असे मला वाटते असो
    मी स्वामींना प्रश्न विचारला स्वामी प्रारब्ध कर्म बुद्धी या विषयी आपण सांगितले जरा ज्योतिष ह्या विषयी सांगाल का
      महाराज हसले म्हणाले खऱ्या साधकाला ज्योतिषाची गरज नसते त्यास फक्त साधना व गुरुनिष्ठा आवश्यक आहे कारण गुरुकृपेने  साधकाचे भविष्य सुद्धा बदलते ह्याचया अनुभव तुझया इतका कोणाला असेल  हे खरं आहे कारण माझे भविष्य फार वेगळे होते व फार वेगळे घडले असो स्वामी म्हणाले तुझी उत्सुकता आहे तर मी सांगतो
     हे बघ ज्योतिष हे एक शास्र आहे ज्योतिशांचे भविष्य खरे ठरते पण त्या ज्योतिषाच्या  मागे दैवी साधना महत्वाची आहे कारण त्यांनी वाणीला तेज येते
  आता बघ तुझ्या जन्म झाला तेव्हा नऊ ग्रह होते व आता ४० वर्षांतर पत्रिकेत अजून तीन ग्रह मांडतात म्हणजे पहिले पत्रिकेत ९ ग्रह मांडायचे आता १२ मांडतात अजून काही वर्षांनी ह्याच्यात सुद्धा वाढ होऊ शकते कारण अवकाश ( आकाश ) खुप विशाल आहे तिथे एकंदर  १६८५ ग्रह आहेत हे अजून कोणालाही माही नाही त्या सगळ्यांचा मानवी जीवनावर फरक पडतोच
आता खुप रात्र झाली आहे तूला लवकर उठायचे आहे मी तुला उद्या कुंडली  सामुद्रिक   ह्या विषयांवर सांगेन गुरु आदेश  विषय चांगला चालवू होता पण त्यांनी थांबवला मी त्यांना  सांगू शकत नव्हतो कि आत्ताच सांगा गुरु आज्ञा मानून मी झोपन्या साठी आडवा झालो विचार करू लागलो बापरे १६८५ ग्रह या सगळ्यांचा  परिणाम  समजण्या पलीकडे आहे सगळं असो बघू उद्या काय ते
क्रमश:---
उद्या बघू ज्योतिष शास्रा विषयक अजून काय स्वामी सांगतील
लेखक श्री विश्वास वाड

💐  जय। गुरुदेव  💐
🌹 क्रमश:--भाग ३३
पहाटे तीन वाजता उठलो स्वामींबरोबर ध्यान साधना करून चार वाजता बादली घेऊन मैय्यावर स्नानास गेलो थोडासा अंधार होता पण सद्गुरूंचे स्मरण करून स्नान केले परत शिव मंदिरात येऊन संध्या पूजन व मातारामांनी दिलेली साधना केली आज नागजपाच्या वेळेस खुपच वेगळे वाटत होते अजून नीट काहीच कळत नव्हते असो
    साधना व पूजा हे सगळे झाले त्यावेळेस ६.३० वाजले स्वामी पण स्नान करून आले स्वामींकारता चहा घेऊन आलो मला तर चहा घ्यायचं नव्हता असो
    सात वाजता सर्व आवरून  आम्ही पुढे निघालो अजपाजप चालू होता  दिवसभर  जप करत चालणे सकाळ दुपार संध्याकाळ एकाग्र साधना करणे रात्री स्वामींची अमृत वाणी ऐकणे अतिशय सुंदर दिनक्रम चालू होते हि सर्व सद्गुरू व मैय्याची कृपा  असच सर्व आयुष्य सद्गुरुकृपेत जावं हीच एक इच्छा
    असच जप करत चालत चालत नावड टोळी, सहस्रधारा,बलगाव येथे आलो दुपार झाली होती स्वामी आज्ञेने इथे दुपारी थांबायचे ठरवले स्नान करून नागाची साधना केली स्वामींना जेवणाविषयी विचारले  त्यांनी हो म्हटल्यावर तेथील आसपास कोरडी  भिक्षा मागून स्वामींकरता  भोजन बनवले त्यांचे भोजन झाल्यावर सर्व आवरून पुढे निघालो खरंच सद्गुरू सेवा करण्यात कमालीचा आनंद मिळतो खरं सांगतो थकवा सुद्धा वाटत नाही असो
   पुढे ढाळखेडा ओलांडून खलघाट येथे आलो पुलाजवळ असलेल्या संकटमोचन हनुमान मंदिरात राहायचे ठरवले तेथेच बालाजी मंदिर होते तेथील महाराज बाहेर गावी गेले होते तेथील पुजाऱ्याने शिधा दिला त्यामध्ये डाळ व आटा होता मी वर्ण चपाती बनवली पुजाऱ्याने दूध नाही म्हणून सांगितले असो
स्नान पूजन व साधना झाल्यावर स्वामींना भोजनास दिले त्यांनी माझया बद्दल विचारले मी म्हणालो दूध नाहि मिळालं मी पाण्याबरोबर खाईन ते हसले म्हणाले अर्धातास जेवू नको मैय्या दूध पाठविलं खरं तर मला खुप भूक लागली होती पण गुरु आदेश थांबलो  खुप वेळ झाला शेवटी स्वामींना विचारले ते म्हणाले बघ दूध आलं आणि आश्चर्य  पुलाजवळील एक चाय वाला दूध घेऊन आला तो म्हणे पुजाऱ्यानी सांगितले असो
 भोजन झाले सर्व आवरले स्वामींपाशी बसलो आज ते ज्योतिषविषयक काय सांगतात ते ऐकण्याची आतुरता होती
स्वामी बोलायला लागले ते म्हणाले बघ काल मी १६८५ ग्रह  आहेत सांगितले पण अजून कोणासही त्याचा शोध नाही पण हे गूढ जर ध्यान साधना केली तर समजू शकते
आता बघ ज्योतिष शास्रनुसार  कुंडलीला जास्त महत्व आहे पण कुंडली बनते कशी तर जन्मतारीख व जन्मवेळ ह्यावरून बनते असं म्हणतात पण खरे भविष्य हे जन्मवेळेपेक्षा गर्भामध्ये जिवाने जेव्हां प्रवेश केला ती वेळ खरी महत्वाची मी हे कसे कळणार म्हणून तर आपल्याकडे गर्भादान हा जो कार्यक्रम केला जातो  त्याला महत्व आहे कारण त्यावरून हिशोबाने वेळ काढता येते तू  गुरुचरित्र  वाचले आहे न म त्यात पिंडाविषयी महाराजांनी व्यवस्थित सांगितले आहे  आता लोक जी पत्रिका पहातात ते ठोक ताळे  आहेत काहींचे खरे ठरते त्याला कारण त्या मागील त्यांची साधना असते असो
आता ज्योतिष शास्रमध्ये सर्वात जास्त भीती हि शनी ह्या ग्रहाविषयी म्हणजे साडेसाती हे नक्की काय आहे किंवा प्रत्येक ग्रहाच एक  वैशीष्ठ आहे ते काय उद्या बघू तू लवकर उठला आहेस व उद्या पण लवकर उठायचे आहे तर जा झोप आता
क्रमश:--
हे बघा स्वामी भरपूर सांगतात मी सर्वाचे सार ( संक्षिप्त ) सांगतोय तुम्ही ज्ञानी आहात समजून घ्याल
ज्यांना काही शंका असेल ते फोन करू शकतात

लेखक श्री विश्वास वाड

💐   जय  गुरुदेव  💐
क्रमश:- भाग ३४
   रोजच्या प्रमाणे ३.०० वाजता उठून ध्यान, साधना, पूजा सर्व आटोपून पुढे निघालो  चिंचली व पुढे कठोरा येथे आलो  स्वामींनी दुपारी येथे थांबायचे ठरवले येथे  एका आश्रमात आलो तिथे कोणीही नव्हते त्या ठिकाणी एक ग्रामस्थ श्री जगदीश जयस्वाल यांनी त्यांच्या घरी येण्याची  विनंती केली पण स्वामी म्हणाले परिक्रमावासी कोणाच्या घरी जात नाही तुम्हांला सेवा करायची असेल तर शिधा आणून द्या त्यांनी म आता,डाळ,व मिरच्या व माझ्या साठी एक भांडे दूध आणून दिले मी स्वामींनकरता चपाती डाळ बनवली नंतर स्नान करून साधना करून स्वामींना भोजन वाढले नंतर मी दूध पिऊन जयस्वाल यांची भांडी परत करून आम्ही पुढे निघालो दुपारची साधना स्वयंपाक  व सर्व आवरणे ह्यामुळे दुपारी विश्रांती करता वेळच मिळत नाही असो
  आम्ही पुढे किनाऱ्यावरून एकादश लिंगाचे दर्शन करून पुढे निघालो पुढे नदंगाव मार्गे ब्राम्हणगावला आलो तेथे शुलेश्वर महादेव मंदिरात आलो व येथे मुक्काम करायचे ठरवले दुपारीच जयस्वाल यांनी दिलेला शिधा होता महादेव मंदिरातील एका महाराजांकडून तवा घेऊन चपाती व डाळ परत बनवली
नंतर संध्याकाळ झाली होती स्नान , साधना, पूजा करून महाराजांचे भोजन झाल्यावर मी दूध न मिळाल्याने पाण्याबरोबर चपाती खाल्ली नंतर सर्व आवरून स्वामींसमोर बसलो स्वामींनी कालचा विषय पुढे चालू केला
   स्वामी म्हणाले बघ आता शनी ह्याबद्दल सगळ्यांचे गैरसमज आहेत  शनी तसा पूर्ण वाईट ग्रह नाही पैसा देणारा शनी हाच आहे त्याचा साडेसाती बद्दल खुप वेगळ्या कल्पना आहेत आता त्याचा साडेसाती बद्दल नीट बघ
     तो  प्रत्येक राशीत अडीच वर्षे राहतो म्हणजे आपल्या राशीच्या आधीच्या राशीत आल्यावर आपली साडेसाती सुरु होते व आपल्या नंतरची राशी सोडल्यावर संपते म्हणजेच तीन अडीच म्हणजे साडेसात वर्ष पण तो साडेसात वर्ष त्रास देत नाही जर पहिल्या अडीच वर्षात त्रास झाल्यास शेवटचे अडीच वर्षे हे फायद्याचे असतात आणि जर पहिले फायद्याचे असतील तर शेवटचे त्रासाचे असतात मधले अडीच म्हणजे शनी आपल्या राशीत असतो तेव्हा फायदा व तोटा काहीच होत नाही म्हणजेच समतोलपणा असतो म्हणजे साडेसातीत  शनी फक्त अडीच वर्षच त्रास देतो हे गमतीने थोडे व्यापारी प्रमाणे झाले पण तसे पाहिले तर शनी हा जातीने तेली आहे  म्हणजेच व्यापारी आहे
  वरील गणिताचे मुख्य उदाहरण म्हणजे १० वर्षांपूर्वी  ( त्या वेळेस ) इंदिरा गांधी यांना ७५ला साडेसाती सुरु झाली आणि त्यांना आणि बाणी व अन्य कारणाने अडीच आरशात सत्ता सोडावी लागली व परत अडीच वर्षां नंतर बहुमताने परत सत्ता मिळाली हे सर्वात मोठे उदाहरण
तसेच मुलगा किंवा मुलगी ह्यांना साडेसातीचा त्रास होत नाही जो पर्यत त्यांची जबाबदारी माता पित्यावर असते त्यांचा त्रास मातापिता भोगतात तसेच सद्गुरुनिष्ठ असलेल्या शिष्याला सुद्धा त्रास होत नाही कारण त्याची जबाबदारी सद्गुरुंवर असते असो आता झोप बाकी उद्या बघू
क्रमश:--
विषय खुप चांगला चालला होता पण गुरु आज्ञा  झोपण्यास जावे लागले
लेखक श्री विश्वास वाड

💐 जय गुरुदेव 💐

💐  जय। गुरुदेव  💐
🌹 क्रमश:-- भाग--- ३५
नित्यनियमाप्रमाणे उठून ध्यान, पूजा , नागाची साधना झाली महादेव मंदिरातील महाराजांनी चहा विषयी विचारले मी सांगितले मी विशेष साधना करत आहे त्यामुळे मला चालणार नाही स्वामींना चालेल त्यांनी चहा दिला स्वामी खुप चिडले मी कोरा ( काळा ) चहा घेत नाही  स्वामी माझ्यावरच खुप चिडले खुप मला बोलले पण मी शांत  होतो मला कळलंच नाही यात माझं काय चुकलं असो
स्वामी म्हणाले मी चहा घेतल्याशिवाय निघणार नाही मी उठलो तेथून गाव थोडे दूर होते मी गावात  जाऊन दूध मागून आणले चहा बनवून स्वामीना चहा दिला डोळ्यात पाणी होते कारण स्वामी खुप बोलले म्हणाले तुला जमत नसेल तर निघून जा असो
 आम्ही पुढे निघालो चालतांना मनात विचार येत होता स्वामी विरक्त असून किरकोळ चहा करता एवढे चिडले मग माझ्या लक्षात आले हि माझी परीक्षा असावी   कारण  गेले एक सप्ताह मी स्वामींबरोबर आहे त्यामुळे मी जे अनुभवलं त्यावरून मला वाटते आजचे रागावणे म्हणजे माझी परीक्षाच
  बघा स्वामीनजवळ काहीही सामान नाही कारण सकाळी संध्याकाळी स्वामी स्नान करतात तेव्हा ते गुंडाळलेल्या  पंचालाच अंग पुसतात व परत तोच गुंडाळतात व जुना रामदास धुवून पंचावरून गुंडाळतात हे एक उदाहरण झाले अशे अनेक प्रसंग येताना रस्त्यात घडले प्रत्येक वेळेस हे निर्विकार होते म विचार येतो ज्यांना वस्त्राची सुद्धा  आसक्ती नाही ते दुधाच्या चहा करता एवढे चिडतील का ? म्हणजेच मी चिडतो का उलटून बोलतो का असो
आम्ही तेथून निघालो तेथील महाराजांनी मला स्थिर रहो इतकंच निघतांना सांगितले  मी सर्व विसरून मनात जप सुरु केला व चालायला लागलो
पुढे विश्वनाथ खेडा नंतर मारू कि चिंचली इथलं शिवमंदिरात आलो स्वामी म्हणाले आपण माध्यांनी येथेच राहू  मी स्वामींना भोजनाविषयी विचारले ते नाही म्हणाले म मी स्नान करून माध्यान्ह साधना केली नंतर स्वामी माझ्याजवळ आले माझया डोक्यावरून हात फिरवला म्हणाले कारे सकाळचे वाईट वाटले का  पण लक्षात ठेव मांजरीचे  दात मांजरीच्या पिलाला लागत नाही  मला खूप भरून आले खरंच  सद्गुरू प्रेम हे मातृवत असते ह्यात थोडीही शंका नाही मी काहीच बोललो नाही म्हणून त्यांनी पुन्हा विचारले काय रे काय झालं म मी म्हणालो स्वामी आईला रागवण्याचा पूर्ण अधिकार असतो त्यामुळे मुलाला त्याचा राग येत नाही असो त्यांच्या ह्या वागण्याने मला खराच काही कळले नाही खरच  आज आई मुलासारखे झाले जस आई मुलाला खुप रागावते व काही वेळाने त मुलाला जवळ घेते असो
   दुपारी येथून निघालो स्वामीं विषयी मनात अनेक प्रश्न निर्माण होऊ लागले नक्की हे कोण व कुठले आहेत हे मलाच का भेटले ह्यांना नक्की काय आहे हे चालतांना बोलतांना वागताना किती शांत निर्विकार व अलिप्त आहेत असं आपण होऊ शकू का
परत एक विचार येई ते कुठले कोण ह्याचा शोध का घेयचा आपली तेवढी पात्रता आहे का हि नियतीची काही तरी अजब लीला आहे म्हणून ते माझ्या सोबत आहेत मी साधनेचा ज्ञानाचा भुकेला  आहे त्यांचे कडून जे
मिळेल ते आत्मसात करू उगाच ते कोण कुठले हा विचार करून वेळ वाया घालवायचा नाही आणि ते कोणीही असले तरी ते आता माझे सद्गुरू आहे त्यामुळे त्यांच्या विषयी विचार येणे हे पाप आहे मला गुरुचरित्रातील भिल्लची गोष्ट आठवली सद्गुरू कोणीही असला तरी ते श्रेष्ठच त्यांचे वाक्य ब्रम्हवाक्य  असे अनेक विचार मनात चालू होते त्यामुळे बराच वेळ जप होऊ शकला नाही वाईट वाटले  स्वताच्या मनाला सक्त ताकीद दिली पुन्हा असले विचार करून वेळ वाया जाता कामा मन खरोखर किती विचित्र असते ह्याचा अनुभव आला असो
विचारांच्या तंद्रीत लोहारा येथे येऊन पोहचलो येथे कपिल मुनींचा आश्रम आहे कपिल मुनींनी येथे तपश्चर्या केली असे म्हणतात
स्वामींनी आज येथे मुक्काम करू असे सांगितले तेथे बाहेर ओट्यावर सामान ठेवले तेथील महाराजांना भेटलो व दोन मूर्ती आहेत असे सांगितले ते म्हणे शिधा घेता का आश्रम प्रसाद चालेल स्वामी म्हणाले आश्रम प्रसाद मला चालेल पण माझा शिष्यास ( मला) फक्त आटा द्या बाकी काही नाही असल्यास दूध द्या तेथील महाराजांनी कारण विचारले मी साधना चालू आहे असे सांगितले मला त्या महाराजांनी आटा दिला स्वामी म्हणाले वेगळे दूध चपाती खाण्यापेक्षा दशम्या ( दुधातच कणिक भिजवून चपाती बनवणे ) बनव  म्हणजे छान लागेल असो
मी संध्याकाळचे स्नान साधना पूजा करून स्वामीच्या भोजनाचे ताट आणले त्यांचे भोजन झाल्यावर मी दशमी खाल्ली सर्व आवरून स्वामीनसमोर बसलो
स्वामीनीं बोलण्यास सुरवात केली ते म्हणाले रस्त्याने तू माझ्याविषयी जो  विचार करत होतास त्या सर्व प्रश्नांची  उत्तरे मी तुला योग्य वेळी देईन मी म्हणालो चालेल पण मला कोणतीही शंका नाही कारण आपण सद्गुरू आहात मला शंका घेऊन गुरुद्रोही व्हायचे नाही ते फक्त हसले त्यांच्या प्रत्येक हसण्यात वेगळेपणा जाणवतो असो
स्वामी म्हणाले आपण कालचा


क्रमश:-- भाग ---३६
स्वामींनी बोलण्यास सुरवात केली ते म्हणाले काल आपण शनी विषयी बघितले आज आपण गुरु ह्या ग्रहा विषयी बघू  लोक म्हणतात की गुरु प्रबळ असला तर फायदा होतो पण नीट विचार केला तर तसे नाही बघ कसे ते
   बघ गुरु हा ग्रह संन्यासी आहे तर संन्यासी पैसे कसे दिल पण गुरु हा प्रबळ असला तर ज्ञान अमाप मिळते सन्मान प्रतिष्ठा मिळते  आता उदाहरण  बघ  मी कुठला कोण तुला काही माहीत नाही माझी सांपत्तिक स्थिती तुला माहीत नाही तरी तू माझा आदर करून सद्गुरू पद दिलेस याचे कारण माझा गुरु ग्रह प्रबळ आहे गुरु हा ग्रह विद्ववत्ता प्रदान करतो त्यामुळे पैसा देणारा ग्रह शनी व प्रतिष्ठा देणारा  ग्रह गुरु असो आता बघ कुंडलीत असे काही योग असतात की मनुष्य त्यामुळे विचारमग्न होतो
जस मंगळाची कुंडली, पितृदोषाची कुंडली कालसर्प योगाची कुंडली  असं अनेक आहेत
नीट विचार केला तर  प्रत्येक कुंडलीत काहीन काही दोष असतो म्हणून घाबरणे हे चुकीचे आहे
आता मी एक उदाहरण देतो बघ कालसर्प दोष कालसर्प दोष फक्त एकच प्रकारचा नाही तर बघा कालसर्प, अर्ध कालसर्प त्रिकोणी कालसर्प असे एकंदर  ५१ प्रकारचे कालसर्प  दोष आहेत आणि माणूस दोष म्हटलं की घाबरतो तर तस नाही जस राहू केतू जप, शिवसाधना,
अश्वथसाधना असे वेगवेगळे कालसर्प योगावर उपाय आहेत आणि ज्योतिष शास्रमध्ये खुप खोल अभ्यास आहे फक्त वरवर ठोक ताळे आले म्हणजे ज्योतिष आले असं नाही  लक्षात ठेव प्रत्येक शास्रला अभ्यास व साधना महत्वाची आहे  आणि सर्वात महत्वाचे  कुंडलीतील  कुठलाही दोष दूर करण्याकरता आपण त्या साधनेत किती एकरूप असतो हे अत्यन्त महत्वाचे आहे
    आणखी एक आपण दोष जाण्याकरता जो उपाय करतो त्यांनी भोग नष्ट होत नाहीत तर भोगाची तीव्रता कमी होते म्हणजे जर सर्पदंश होणार असेल आणि उपाय केला तर सर्पदंश न होता  सर्प समोर येऊन मनात भीती निर्माण करतो
म मनात विचार येईल की पत्रिकतेतील  भोग नष्ट होण्याकरता व सर्व भविष्य  बद्दलण्याकरता  सर्वात महत्वाचा  उपाय कोणता तर तो एकच म्हणजे पूर्णपणे मनात कोणतीही शंका न ठेवता  सद्गुरूंला शरण जाणे गुरुनिष्ठ गुरुसेवा प्रति एकाग्रता अत्यन्त महत्वाची पण मनुष्याकडून हे होते का हा खरोखर संशोधनाचा विषय आहे असो हा खुप मोठा विषय आहे जाऊ दे बाकी उद्या बघू तू झोप आता
क्रमध:--
स्वामी खुप काही बोलले सगळं लिहण खुप कठीण आहे मंगल दोषांवर सुद्धा स्वामी अर्धा तास बोलले स्वामी रोज दोन ते अडीच तास बोलत
लेखक श्री विश्वास वाड

💐  जय  गुरुदेव 💐
🌹 क्रमश:--- ३७
नित्यनियमांप्रमाणे ३ वाजता उठलो ध्यान, स्नान, संध्या, साधना, पूजा सर्व आटोपून ७ वाजता पुढे जाण्यास निघालो लोहारा गावातच कपिलाश्रमा पुढे एका घरातून चहाकरता  आवाज आला त्यांनी घरात बोलावले पण स्वामींनी घरात येण्यास नकार दिला म तिथेच ओट्यावर बसलो त्यांनी स्वामींना चहा दिला मी चहा घेत नाही असं सांगितलं असो
    पुढे महिपुरा येथे शिव मंदिरात आलो स्वामींनी  दुपारी येथेच थांबायचे ठरवले म आजूबाजूच्या घरातून शिधा मागून स्वामीन करता खिचडी बनवली नंतर स्नान करून दुपारची साधना केली स्वामींचे भोजन झाल्यावर सर्व आवरून पुढे निघायचे ठरवले स्वामी म्हणाले इथून दोन तीन मार्ग आहेत आपण प्रथम दत्तवाडा  जाऊ नंतर बघू  मैय्या  ठरविलं मग  आम्ही मधल्या रस्त्याने दत्तवाडा येथे निघालो आम्ही दत्तवादा येथे पोहचलो
    दत्तवादा येथील कपालेश्वर महादेव मंदिरात आम्ही थांबलो  आम्ही  बाहेर थांबत होतो तेथील पुजाऱ्याने  सांगितले म्हाराजजी थंडी बहोत होती है आप अंदर रुकिये स्वामीनीं मान्यता दिली आम्ही आत थांबलो तेथिल  पुजाऱ्याने स्वामींकारता शिधा दिला भांडी पण दिली शिध्यात बरेच काही होते म मी वरण भात, टॉमेटो बटाटा भाजी चपाती आणि त्या पुजार्यांनी रवा तूप साखर पण दिली होती मी शिरा पु बनवला नंतर स्नान संध्या साधना पूजा झाल्यावर स्वामींना भोजनास दिले ते म्हणाले बघ मैय्याच  प्रेम आज  गोडाचे भोजन मिळाले म मी दूध चपाती घेतली सगळे आवरून स्वामीन समोर बसलो
   स्वामी  म्हणाले आपण दोन तीन दिवस ज्योतिष विषयक बोललो  यात एक महत्वाचे कि ग्रह किंवा त्यांची दृष्टी वाईट असली तरी सद्गुरू कृपा जर असेल तर भविष्य बदलते म सद्गुरू अनुग्रह व सद्गुरुकृपा  व सद्गुरुसेवा ह्या सर्व विषयी आपण बघू
प्रथम अनुग्रह  आता बघ  अनुग्रह म्हणजे फक्त कानात मंत्र घेणे एव्हढेच नाही त्या मागील सर्व तथ्य बघू
सद्गुरू ज्या वेळेस कानात मंत्र देतात त्यावेळेस ते मंत्राद्वारे शिष्याचा शरीरात प्रवेश करण्यास सुरुवात करतात  ह्याचा नक्की अर्थ काय आपण उद्या बघू झोप आता
क्रमश:---
स्वामी खुप सुंदर विषय निवडतात व बोलतात पण सुरवात करून विचार करण्यास प्रवृत्त करतात
लेखक श्री विश्वास वाड

💐   जय गुरुदेव  💐
क्रमश:--भाग ३८
पहाटे नेहमी प्रमाणे ३-०० वाजता उठलो ध्यान साधना झाली आज जरा थंडी खुप आहे स्नान करायला जायची हिम्मत होत नव्हती स्वामीनीं ओळखले ते म्हणाले तुला संध्या पूजा साधना हे करायला वेळ लागतो जर सात वाजेपर्यत तुझे नाही झाले तर मी निघून जाईन मग मात्र हिम्मत केली स्नानास गेलो स्नान करून अक्षरश: कुडकुडत होतो तेथील प्रेमदास महाराज हसत होते असो
साधना संध्या पूजा केली प्रेमदासांनी विचारले चहा घेणार का मी म्हटले साधना चालू आहे चहा चालणार नाही मग त्यांनी गरम पाणी प्यायला दिले ह्याला म्हणतात दुधाची तहान ताकावर भरवणे असो
स्वामींनी दिलेल्या वेळेच्या आत म्हणजे ६.३० वाजताच तयार झालो स्वामींचे स्नान झाले त्यांनी चहा घेतला व आम्ही पुढे निघालो
स्वामी म्हणाले आपण खुप वेगळ्या रस्त्याने जाऊ तिथून आम्ही दही बेहडा पिप्पलूद मार्गे दुपारी कारावद येथे आलो रस्त्यातच खैरी गावात स्वामीच्या सांगण्यावरून शुस्क भिक्षा मागून घेतली होती
कारावद येते माताजींचा आश्रम आहे तेथे दुपारचे थाबायचे ठरवले माताजिंकडून भांडी घेऊन स्वामींकरता भोजन बनवले मला दूध मिळाले नाही म्हणून मी जेवलो नाही
असो सर्व आवरून पुढे निघालो
पुढे राजघाट येथे आलो येथे
श्री प.पु.वासुदेवानंद टेम्बे स्वामी स्थापित एकमुखी दत्त मंदिर आहे त्या ठिकाणी मुक्काम करायचे ठरवले
तेथे सदावर्त ( शिधा ) मिळाला स्वामींकरता खिचडी बनवली व माझया करता दोन चपात्या  बनवल्या नंतर स्नान करून साधना पूजा आरती करून आज येथे स्वामींच्या आज्ञेवरून येथील दत्ताची पण आरती केली नंतर भोजन झाले
स्वामींसमोर येऊन बसलो त्यांनी बोलण्यास सुरवात केली त्यांनी ग्रहांविषयी पुन्हा दोन दिवसांनी बोलेन असं सांगितले आज मी तुला दानाविषयी सांगतो
बघ अनेक प्रकारची दाणे आहेत ह्यामध्ये सर्वात जास्त होणारी दाने म्हणजे दक्षिणा वस्त्र आणि अन्न  हि दाने होतात आता बघ सर्वच दाने चांगली करावी पण अन्नदानाला सर्वात जास्त महत्व आहे कारण त्यानी आत्मातृप्ती  होते बाकी कोणत्याही दानाने आत्मातृप्ती होतेच असं नाही आपण ज्याला दान देतो त्याची योग्यता लागते म्हणजेच दान सत्पात्री व्यक्तीलाच द्यावे असे शास्त्र सांगते अन्यथा दोष आहेत ह्यासाठी मी तुला एका चक्रा विषयी सांगतो नीट ऐक
समज एखाद्या व्यक्तीने तुला ५०रु.दक्षिणा दिली आणि तू त्या दक्षणेचा गैरवापर केला तर त्याचा दोष  ज्यांनी तुला दान दिले त्याला जातो कारण योग्यता नसताना दान दिले गेले  हे सर्व दानांना लागू आहे अन्नदान सुद्धा समोर बसूनच करावे ह्या विषयी मी तुला उद्या आणखी विस्तार पूर्वक सांगेन  झोप आता
क्रमश:---
खरं सांगतो हे विस्तारपूर्वक ऐकण्याची खुप इच्छा होती पण काय करणार स्वामी आज्ञा थंडी वाजतेय झोप येत नाहीये ते बोलले त्यावर विचार करत पडलो
लेखक श्री विश्वास वाड

💐 जय गुरुदेव 💐
🌹 क्रमश:---भाग ३९
नित्यनियमाप्रमाणे पहाटे ३.०० वाजता उठून ध्यान,साधना, पूजा,झाली खरोखर दत्तपभुंची ,मैय्याची व सर्वात मुख्य माझ्या सद्गुरुंची माझ्या वर खुप कृपा आहे त्याचे प्रत्यंतर वेळोवेळी येते
इथे बघा माझ्या वरील कृपेचा अनुभव ज्या एकमुखी दत्ताची स्थापना
श्री प.पु.टेंबे स्वामींनी केली त्या दत्तास अभिषेक ( माझ्या हस्ते ) करायला मिळाला माझ्या जवळ काहीही नसताना तेथील पुजाऱ्याने सर्व काही देऊन दत्तास रुद्र अभिषेक केला खूप समाधान मिळाले अभिषेक करत असताना डोळे भरून आले काय योग असो
सर्व होईपर्यंत आठ वाजले पुढे तेथून निघालो स्वामी नि सांगितल्या प्रमाणे वेगळा रस्ता म्हणजे आम्ही कुलि घोंगसा न जाता आम्ही बडवानीस निघालो पुढे बडवानीस एका सद्गृहस्थाने थांबवून स्वामी चहा दिला नंतर आम्ही पाटी मार्गाला लागलो खुप चढण आहे घाट रस्ता आहे खांद्यावरील सामान घेऊन चढताना अक्षरश: दमछाक होतेय पण स्वामी रस्ता एकदम सोपा आहे असेच चालत होते
नंतर आम्ही बावनगजा पाशी आलो मी खुपच दमलो होतो स्वामी म्हणाले दुपारी आपण येथे थांबू
स्वामीनीं सांगितले ह्या डाव्या बाजूला जैन लोकांचे देवस्थान आहे वरती ५२ गज उंच बुद्ध मूर्ती आहे जायचे का माझी अजून वर चढण्याची हिम्मत नव्हती मी नम्र पणे नकार दिला व म्हणालो आपली आज्ञा असेल तर जाऊ ते म्हणाले ठीक आहे नाही जायचे हे ऐकून खुप आनन्द वाटलं स्वामीनीं ओळखले ते फक्त हसले असो  तेथेच मैय्या नसल्याने हॅन्ड पंप वर स्नान करून साधना केली
दुपारी विश्रांती घेऊन पुढे पाटीस आलो येथील साई मंदिरात मुक्क्म करायचे ठरवले
इथे पण मैय्या नाही जवळपास भिक्षवृत्तीने शिधा आणला समोरील एका मातारामने वातीचा स्टोव्ह दिला त्यामुळे चूल न बनवता स्टोव्हवर खिचडी चपाती व भेंडयाची भाजी बनवली नळावर स्नान करून साधना पूजा आरती करून स्वामींना भजन दिले नंतर मी दूध चपाती खाल्ली सर्व आवरून स्वामींसमोर बसलो
स्वामींनी बोलण्यास सुरवात केली ते म्हणे मी काळ तुला अन्न दान समोर करावे ह्या विषयी बोललो मी तुला एक  दृष्टांत सांगतो नीट ऐक
   एका मंदिरात एक  अतिशय सात्विक महाराज रहात होते आयुष्यात त्यांच्या कडून कुठलेही वाईट कर्म झाले नव्हते त्यांनी मुंगी सुद्धा मारली नव्हती
   एकदा ते डाळ-वाटी बनवत होते तेथे एक गरीब माणूस आला तो म्हणाला महाराज मी दोन दिवसांपासून उपाशी आहे मला भोजन द्याल का महाराज म्हणाले बस डाळ-वाटी होत आली आहे नैवेद्य दाखवतो व तुला देतो नंतर महाराजांनी त्याला एका पत्रावळीत दोन वाट्या व त्याला भरपूर तूप लावून दिले आणि खा म्हणाले तो  म्हणाला महाराज मी मैय्या किनारी बसून खाईन व तेथेच पाणी पेईन म्हहाराज म्हणाले ठीक आहे तो गेला
     काळ परत्वे महाराजांनी देह ठेवला वर कंपोल कल्पित यम दरबारात महाराजांना  उभे करण्यात आले यमानी चित्रगुप्तांस विचारले यांचे पाप व पुण्य किती चित्र गुप्त म्हणाला यांचे सर्व पाप आहे पुण्य काही नाही महाराजांना आश्चर्य वाटले ते म्हणाले असं कसं तुलाही आश्चर्य वाटलं न कि ते तर सात्विक होते मुंगी पण मारली नाही मी असं कसं
  मी म्हणालो हो खरंच आश्चर्य आहे हे असं कसं हो स्वामी ते म्हणाले मी हे कसं झालं हे उद्या सांगीन झोप आता मी काही तेथून हाललो नाही स्वामी म्हणाले एकदा सांगितलन उद्या तर उद्या तू कितीही वेळा बसलास तरी सांगणार नाही खुप हुरहूर लागली पण काय करणार गुरुआज्ञा तेथून उठलो मी ते सर्व ऐकून येणारी झोप पळाली
क्रमश:--
खरं सांगतो गुरु आज्ञेव्यतिरिक्त साधकाला दुसरं मोठं काही नाही ह्या त्यांच्या अर्धवट सांगितलेल्या कथेवरून कळले की आपण कुठलीही गोष्ट समजून घेण्याकरता अधीर नसावे स्थितप्रज्ञता असावी
लेखक श्री विश्वास वाड

💐  जय  गुरुदेव 💐
🌹 क्रमश:---- भाग ४०
नित्यनियमाने पहाटे उठून ध्यान, साधना,पूजा करून पुढे निघण्यासाठी ६.३० ला तयार झालो  मंदिरासमोरील मातारामने स्वामींना चहा दिला नंतर आम्ही पुढे निघालो
रस्त्याने चालत होतो मनात अजपा जप चालू होता आज महाराजांची आठवण येत होती ती म्हणजे कि मी त्यांच्या पासून दूर आहे त्यांच्या जेवणाचे काय होत असेल असे विचार येत होते त्यामुळे मधूनच जप थांबत होता
असो माध्यांना करता रस्त्यात एका झाडाखाली थांबलो खुप मोठे झाड होते त्या मुळे भरपूर सावली होती तिथे एक ओहळ होता तेथे स्नान केले साधना केली तेथे जवळपास काहीच नव्हते त्यामुळे स्वामींच्या जेवणाचे पण नाही झाले स्वामी म्हणाले मला पण भूक नाही असो
पुढे बोकराटा येथे श्री राम मंदिरात उतरलो मंदिर खूपच लहान आहे असो तेथे बाजूला असलेल्या किराणा दुकांदाराने शिधा दिला मी स्वामींनकरता खिचडी बनवली आटा न मिळाल्याने चपाती नाही बनवली तेथील नळावर स्नान करून संध्या  साधना पूजा केली स्वामींना भोजन दिले बाकी बंदी घासून दुकानदाराने मला फक्त  एक ग्लास दूध दिले ते प्यायले सर्व आवरून स्वामींसमोर बसलो कारण कालच त्या महाराजांचं काय पाप
 स्वामींनी बोलण्यास सुरवात केली की काळ बघितले चित्रगुप्तांने सांगितले ह्यांचं सर्व पाप आहे त्या म्हाराजाने सांगितले माझे काय पाप आहे तर चित्रगुप्तांने सांगितले की तुमच्या नावावर बऱ्याच हत्या आहेत त्या म्हाराजाने सांगितले क्स शक्य आहे मी कधी मुंगी सुद्धा मारली नाही तेव्हा चित्रगुप्त म्हणाले की तुम्ही जु माणसाला भोजना करता तू लावून वाटी दिली त्याने नर्मदा किनाऱ्यावर जाऊन काठीला वातीचा तुकडा लावून मासा मारला व तो मासा बाजारात विकला तेव्हा त्याला कळले की मासेमारीच्या पैसे मिळतात त्याने तोच उद्योग सुरु केला मासे मारी म्हणजे हत्याच त्यांनी आजपर्यत जितके मासे मारले त्या सर्व हत्या तुमच्या नावावर झाल्या कारण पहिला मासा तुमच्या वाटीच्या मारला गेला व त्याला हा हत्येचा मार्ग मिळाला म्हणून सर्व हत्या तुमच्या नावावर म्हणून अन्नदान हे समोर करावे व कुठलेही दान सत्पात्री करावे म्हणजे त्याची योग्यता आहे का आपण दिलेल्या दानाचा योग्य विनियोग होईल तरच दान द्यावे कळलं झोप आता बाकी उद्या बघू
क्रमश:---
लेखक श्री विश्वास वाड

💐  जय  गुरुदेव। 💐
🌹क्रमश:---   भाग ४१
नित्यनियमाने पहाटे उठलो ध्यान, झाले थंडी होती पण स्नान तर करायचेच कारण परिक्रमा, साधना ,पूजा,करायची आहे असो स्नान झाले नित्य कार्यक्रम आटोपले खूपच थंडी होती मी नळावर स्नान करीत असतांना त्या समोरील व्यक्तीने बघितले त्यांनी चहा विषयी विचारले पण मी त्याला नाही म्हटले गरम दूध आहे का विचारले तो घरात गेला
      स्वामीनीं हे ऐकलेले चिडले म्हणाले एवढी थंडी वाजते तर मागे फिर तुला काय निमंत्रण दिले होते का लाज नाह वाटत कोणाकडे काही मागताना आपण माध्यांनी जे मागतो ती भिक्षा तू आत्ता जे दूध मागितले ती भीक
अरे भिक्षा मागणे म्हणजे अंह नष्ट करणे व भीक मागणे म्हणजे लाचारी पत्करणे भीक मागून तू गुरूंचा अपमान होतो हे लक्षात येत नाही का जमत नसेल तर निघून जा खूप खूप बोलले खर्च असाह्य होत होत पण चूक माझीच होती शेवटी मी त्यांच्या पायावर डोकं ठेऊन क्षमा मागितली
ते म्हणाले माझी नाही तू व्यक्ती येईल तिच्या पायावर डोकं ठेव व क्षमा माग थोडं विचित्र वाटले पण गुरुआज्ञा असो
ती व्यक्ती गरम दूध घेऊन आली स्वामीनीं सांगितले दूध  नाही चाहिये  इसका मी त्या व्यक्तीच्या पायावर डिके ठेऊन माफी मागितली ती व्यक्ती म्हणाली ये क्या कर रहे  हो मी म्हणालो मैने आपसे दूध मांगा ये गलती हो गई  मैं परिक्रमा कर राहा हूं मुझे मागना नाही चाहिये
स्वामी म्हणाले मला थंडी नाही वाजत का माझ्या अंगावर तर हया पंचा आहे तो सुद्धा ओला आहे पण साधकाकडे सहनशीलता हवी असो
     ती व्यक्ती गेली तिने त्या दुधाचा चहा करून स्वामी करता आणला स्वामीनीं हातात घेतला त्या कडे पाहिले व त्या व्यक्तीस प्रसाद म्हणून परत दिला त्या व्यक्तीला म्हणाले ये मेरा शिष्य है या इसको थंड लग रही है ये कुछ नाही लेंगा तो मै भ कूछ नाही लुंगा आप ये मैय्या प्रसाद समजकर ले लो
मला खुप वाईट वाटले कारण माझ्या मुळे स्वामी पण चहा न पिता निघणार आहेत स्वामी मला म्हणाले मी तुला त्याला नमस्कार करण्यास का सांगितले हे रात्री सांगीन
आम्ही पुढे निघालो पुढे बारीफलिया येथे आलो स्वामी म्हणाले आपण येतून रस्ता बदलू असं म्हणून स्वामी तेथिल कोरड्या नाल्यात उतरले तेथून पाय वाटेने निघालो पूर्ण  जँगल रस्ता होता ते म्हणाले आपण येथून  शूलपाणी झाडीत जाऊ  पूर्ण घनदाट रस्त्याने संध्याकाळी आम्ही रानीपुर  येथे पोहचलो  तेथे एका एका झाडाखाली मुक्काम करायचे ठरवले येथे जवळ पास काहीही घर दिसत नव्हते स्वामी म्हणाले आज उपवास करायचा का मी काही बोललो नाही थोडा वेळ गेला असेल मी तेथे जवळ असलेल्या ओहळावर स्नान करण्यास जाऊ का असे विचारले ते म्हणाले थांब मैय्या आपल्याला शिधा किंवा भोजन पाठवतेय  काय येत बघू मग जा अजून थोडा वेळ गेला असेल एक व्यक्ती समोरून यरत होती त्या व्यक्तिच्या अंगावर फक्त एक लंगोटी आणि खांद्यावर एक पंचा होता व हातात एक फडक्यात काही तरी गुंडाळलेले होते
  ती व्यक्ती समोर आली स्वामीना नर्मदे हर म्हणून नमस्कार केला व म्हणाला आप परिक्रमावासी है ना स्वामी म्हणाले हा म त्या व्यक्तीने फडक्यात गुंडाळलेले स्वामींनसमोर ठेवले ये आपले लिये है आणि ती व्यक्ती निघून गेली स्वामींनी उघडून बघितले तर त्या पाच सह चपात्या होत्या व थोडेसे तूप साखर होते स्वामी हसले ते म्हणाले चल स्नान करून येऊ सामान तेथेच ठेऊन आम्ही ओहळावरून स्नान करून आलो मी साधना पूजा केली आणि आश्चर्य मी मातारामने दिलेला जप करीत असताना मातारामाने दिलेला नाग जिथे ठेवला होता त्याचा मागे काही अंतरावर खरा नाग आला मी घाबरलो स्वामींनी पाहिलं ते म्हणाले घाबरू नको तुझा जप चालू ठेव तो काही करणार नाही मी मनाचा हिय्या केला डोळे बंद केले व जप चालू ठेवला जप संपल्यावर हळूच डोळे उघडले तर समोर नाग नव्हता स्वामी म्हणाले अरे काय बघतोय तो त्याचा मार्गाने गेला हा शुभं संकेत आहे म्हणजे तुझी साधना योग्य चालु आहे हे ऐकून कुओ बरे वाटले
इथे दूध नाही मी पाण्या बरोबर चपाती खाल्ली स्वामीनीं तुपसाखर व चपाती खाल्ली असो मी स्वामींसमोर बसलो आज ते काय सांगतील ह्या विषयी उत्सुकता होती
क्रमश:--
लेखक श्री विश्वास वाड

💐  जय गुरुदेव 💐
🌹 क्रमश:--- भाग ४२
सर्व आवरून मी  स्वामींपाशी बसलो आता आज स्वामी काय सांगतील हि उत्सुकता होती
स्वामी म्हणाले सकाळी मी तुला त्या माणसाच्या पाया पडायला सांगितले तुला अपमान तर नाही वाटलान मी म्हटलं माझा मान अपमान सर्व तुमच्या चरणावर आणि तुमची आज्ञा मला सर्वस्व  आहे
स्वामी म्हणाले मी तुला नमस्कार करायला सांगितले कारण नत झाल्याने अहंकार नष्ट होतो कारण तू परिक्रमा करतोयस कोणालाही हे द्या सांगणे म्हणजे परिक्रमेचा अहंकार पण तुला अहंकार आहे की नाही हे बघायचे होते पण तू कुठलाही किंतु मनात न ठेवता लगेच नत झालास म्हणजे तुला अहंकार नाही म्हणजे तू योग्य साधक होऊ शकतो असो
काल आपण  अन्नदानाविषयी बघितलं बघ अन्नदान आणि इतर दान ( वस्त्रदान,गोप्रदान ,दक्षिणादान, व बरीच )ह्यात अन्नदानच श्रेष्ठ आहे कारण अन्नदानाने आत्मातृप्ती होते बाकी कुठल्याही दानाने आत्मतृप्ती होतेच असं नाही
कोणी अन्नदान केलं तरी ते खरं साधू संन्याशी किंवा साधक स्वीकारत नाही कारण अन्नाला सुद्धा दोष असतात ह्याचा तुला एक दृष्ट्यांत देतो
एका एक अतिशय सज्जन साधु रहात होता तो शुष्क भिक्षवृत्तीने उदरनिर्वाह करत असे पण एकदा एका व्यापाऱ्याने जबरदस्तीने त्या साधुस जेवायला बोलावले साधू  मनाविरुद्ध त्याचा कडे जेवणास गेला त्याने साधूला रजत  ( चांदी ) पात्रात भोजन दिले साधूने त्या व्यापाराचे लक्ष नाही असं बघून एक वाटी त्याने झोळीत टाकली सर्व झालयावर तो साधू जय ठिकाणी राहत होता तेथे आला आपल्या देवतेसमोर आल्यावर त्या साधुस विचत्र व अस्वस्थ वाटायला लागले त्याने न राहून शेवटी उलटी केली सर्व अन्न बाहेर पडले त्याला थोडे बरे वाटले नंतर त्याने आपली झोळी बघितली व त्यात रजत वाटी बघून तो आश्चर्यचकित झाला त्याने त्या व्यापाऱ्यास बोलावणे पाठवले बाकी काय झाले ते उद्या सांगेन झोप आता
मी स्वामीना नमस्कार करून म्हटले असं रोज का करता मला फार उत्सुकता लागते तेव्हा स्वामी म्हणाले साधकाने एखाद्या गोष्टीत इतके रममाण  व उतावीळ होऊ नये ह्यालाच स्थितप्रज्ञ अवस्था म्हणतात झोप आता
कर्मश:--
मी झाडापासून जरा दूर झोपला होतो पडल्या पडल्या विचार चालू होता की मला स्थितप्रज्ञ अवस्था येईल का व कधी तेवढ्यात स्वामी ओरडले झोप आता झोप येत नसेल तर जप कर विचार करून वेळ वाया घालवू नये
लेखक श्री विश्वास वाड


















3 comments:

  1. too good if possible please provide entire pages of parikrama

    ReplyDelete
  2. nice one just feels to go on reading and reading

    ReplyDelete
  3. अप्रतिम आहेत सगळे भाग. please पुढचे भाग पोस्ट कराल का

    ReplyDelete