1)
श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय शंकर
श्री स्वामी समर्थ अक्कलकोटी
दर्शन देती भक्तांच्या प्रेमापोटी
ज्यांच्या नाम सदा ओठी राही
त्यास दत्त दिगंबर भेट घडून येई।।1।।
श्री गुरुदेव दत्त राही गिरनार तीर्थ
नामात रमता गळूनी जाई स्वार्थ
अंतरी मम गुरुचे अस्तित्व पाही
तिथे दत्त दिगंबर भेट घडून येई।।2।।
खांद्या लावूनी भक्त प्रेमाची झोळी
शोधी नित्य जिथे नामाची आरोळी
गुरु आणि भक्त एक होऊन जायी
तिथे दत्त दिगंबर भेट घडून येई।।3।।
पायी खडावा शोभे जटा शिरी
लावूनी शुभ्र भस्म कपाळी
करी वाईट कर्मांची होळी
तिथे दत्त दिगंबर भेट घडून येई।।4।।
गुरुदत्त राया असे मनी तुझा वास
चढता भक्तीची शिखर येई सुवास
दत्तरुप स्वामी एकांती जवळून जाई
तिथे दत्त दिगंबर भेट घडून येई।।5।।
श्री दत्तराया तू गिरनारवासी
तव चिंतनात तू चढवी शिखराशी
अजाण बालक मी कृपाशिर्वाद देई
इथेच दत्त दिगंबर स्वरुप भरुन राही।।6।।
श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय शंकर
2)
श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ
श्री दत्त जय दत्त
श्री गुरुदेव दत्त नाम
पाहता गुरुशिखर
येते रोमरोमातूनी
पाहीन कधी चरण
या नजरेतूनी
जाईन दत्त
दत्तमय होऊनी
लागले मन
दत्तचरणी
प्रगटले अवधूत
मनोमनी
आनंदे मन
नाचे उल्हासुनी
नाम प्रगटे
पदापदातूनी
श्री गुरुदेव दत्त
मुखे म्हणताची
ओढ लागे मग
दत्त दर्शनाची
एक एक पायरी
असे सत्वाची
पाऊले पुढे पुढे
पडती आनंदूनी
चढता पायरी
जाई विरुन अहंता
मुखी येई नाम
गुरुदेव दत्त कित्येकदा
धाव घेई आई
पुकारता एकाग्रतेने
येई बळ पायात
गुरुला आठवूनी
भुलभुल्लैया
असे गुरुशिखर
जवळ येता
नजर होई स्थिर
अंतरी विचारांचे
माजे काहूर
आनंदाचे फुटती
कारंजे मनी
दर्शन होता
श्री गुरूंचे समोरी
पटे न ओळख
घाबरे चित्त भारी
नजर भिरभिरे
अंगी येई शिसारी
तृप्त होई मन
लागे दत्तभजनी
श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय शंकर
3)
श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ
जय शिव दत्त दिगंबर
तुझे रुप दिसे मनोहर
मनी वसे सदैव निरंतर
राहू दे तुझी कृपा सर्वांवर
जटेत असे गंगा सुंदर
समृध्द करी जीवा अपार
जय दत्तगुरु रुपी शंकर
तुझी आस मज खरोखर
गिरीनारी असे त्रिगुण अवतार
पाहण्या तुज शिणते नजर
कधी भेटसी मज तू यतिवर
आतूर भेटण्या दत्त दिगंबर
नाम घेता तुझे दत्त गुरुवर
मनी वीणा झंकारे क्षणभर
तळमळ होता छेडी तार
ब्रम्हा विष्णू महेश उभे समोर
श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ
4)
श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ
अंतरात डोकावून स्वतःला
सद्गगुरु मनोमनी देखिला
अर्पूनि भावपुष्पांची माला
स्वामींसंगे जीव माझा रंगिला
स्वामींचा ध्यास मनी लागला
कधी विसर न पडे मजला
तव चरणात जीव घुटमळला
आठवण येऊनी कंठ दाटला
दिसे न अन्य काही मजला
हृदय मंदिरी स्वामी पूजिला
मानसपूजेत जीव अडकला
शोधिते मी गुरुचरणाला
तन मन धन एक करुनी
नामस्मरणी प्राण ओतला
कशास शोधू मी सद्गगुरुला
तो तर माझ्या मनी वसला
5)
श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ
नको पाहूस मजला तू
शांत नजर कटाक्षातून
होते मी कावरीबावरी
राधा ही अशी कृष्णवेडी
ध्यानीमनी प्रेम गुरुवरी
सदा मी स्वामीं बरोबरी
घेऊनी नामाची शिजोरी
ओढीते जीवनाची दोरी
नयनांत दिसे प्रीत भरुन
बघता तुज भान हरपून
नामात होई मी बेभान
गुरुवरा येई रे धावून
रोजची नित्य तुझी सेवा
करते मन लावून गुरुदेवा
तुझ्या तेजाचा दिप जळतो
मम हृदयात नित्य स्वामीदेवा
सदासर्वदा हात जोडते
तुजलागी भेटण्या झुरते
पदर पसरुनी मी शरणागत
दत्ता कधी मिळेल चरणामृत
दिलेस मज तू सेवाव्रत
आकंठ बुडूनी नामात
सेवेत मज तू दिसे सतत
कष्ट दूर करिसी असंख्यात
नमो स्वामीनाथा अनंता
शक्ती दे कराया सेवाव्रता
मीपणा जाऊ दे विलया
मिळो तवपदी विराम जीवा या
श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ
6)
श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ
किती कृपाळू माऊली
देई सदा प्रेमाची सावली
एकच आस एकच ध्यास
जन्मोजन्मी लाभो तुझा
असाच सुखाचा सहवास
साथी सोबती तुच माझा
पुरविशी तू मनीची ईच्छा
हात जोडूनि पदर पसरते
लाभो सर्वांना तुझा असाच
आशिर्वादाचा हात मस्तकावरी
होऊ दे सर्वांवर कृपेची बरसात.
श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ
7)
श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय शंकर
वाचूनिया अवतरणिका भान न राहिले।
गुरुचरणाचे वेध या जीवा लागले।
क्षणोक्षणी दत्तनामी मन रत झाले।
ओम गुरु ओम गुरु अवधूता तू ही
ओम तू ही ओम श्रीदत्ता।
मंत्रातून दत्तरुप समोर उभे ठाकले।
भार घेतला जरी संसाराचा शिरावरी।
अंतरी दतस्वामी रुप असे वसले।
गिरीशिखरी जाण्या मन आसुसले ।
भेटण्या गुरुमहाराजा मन व्याकुळ झाले।
गुरुचरीत्राचे सार वाचून चित्त।
गुरु चरणकमली नतमस्तक झाले।
धन्य धन्य हो प्रदक्षिणा सद्गगुरुरायाची।
माझ्या स्वामीरायाचे मजवरचे प्रेम।
पाहूनी जीवन धन्य झाले।
श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय शंकर🙏🙏
8)
श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ
आयुष्य असते पुस्तक
लिहायचे असते आपण
कसे जगावे चांगले की वाईट
असते आपल्याच हातात
एवढे सगळे हक्क असताना
आपण का बर विचार करायचा
आनंदाने मजेत हसत खेळत
येणार्या क्षणांचा मर्जीप्रमाणे
आस्वाद घेत क्षणोक्षण जगायचा
आनंद पेरला तर आनंदच मिळेल
दुःखात सुध्दा आनंदी राहता येईल
सद्गुरुंचा प्रेमळ हात डोक्यावरुन फिरेल
नामस्मरणी गुंग होऊन या जन्माचे मोल कळेल.
श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ
9)
श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ
श्री दत्त जय दत्त वदता नित्य वाचे
उभे दत्तरुप समोर मज अंतरीचे
सरुन जाती पापे मन आनंदे नाचे
वेध लागले मज गिरीनारीच्या भेटीचे
आतूर होई कंठ दिसती गुरुचरण
मग्न होई मन ध्यानीमनी दत्तस्मरण
दिसती पायऱ्या गिरीशिखर चढण
मनी वसे एक दिव्यत्वाची खूण
तुझी इच्छा तुच बोलावसी भेटीस
दत्ता अवधूता घालव रे दडपणास
एक पाऊल न टाकू शके तव इच्छेविना
घेऊन जाशील ना रे मज तव दर्शना
हे श्री स्वामी समर्था श्री गुरुदेव दत्ता
तुझ्या चरणी सोडते रे मम सर्व चिंता
आता एकच ध्यास एकच आस जीवा
कधी डोळे भरुन पाहीन तव रुप देवा
जय गिरनारी तेरा भरौसा है भारी
तुझ्यावरच या भक्ताची भिस्त सारी
श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ
10)
श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ
शरणागत मी तव पाया ।
धाव धाव घेई रे गुरुराया।
गुरुविण मन विसंबे न क्षणभरी।
करुणा भाकूनी आळवी निरंतरी।
करीत तव मनापासूनी सेवा चाकरी।
समजे न मज देवा चूक बरोबरी।
तूच करवूनी घेसी सेवा माऊलीची।
जिने बाळपणी वाढवले या जीवासी।
व्हावा न त्रास तीज या उतारवयासी।
स्थिर होऊ दे मन तिचे तव पदासी।
प्रारब्ध भोग कधी कुणा न टळले।
तुझ्या हातीच असे आयुष्याचे दोरे।
दिनदयाळा भक्तवत्सला दिनानाथा।
पावन करुनी जीवन या जीवा उध्दरा।
श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ
11)
श्री गुरूदेव दत्त श्री स्वामी समर्थ
ओम दत्त श्री दत्त जय दत्त श्री गुरुदेव दत्त नाम
घेता समोर उभे राहती दत्तकरुणासागर।।धृ।।
दत्त परब्रम्ह तव रुप मनोहर।
तव दर्शना मन रे व्याकूळ।
तुझसी भेटण्या मन आतूर।
विश्वास मज नेसी मजशी तू बरोबर।।१।।
दत्तराया येऊ दे करुणा खरोखर।
लीन तव चरणी कृपा करा गुरुवर।
जाणवे मज अंतरीची थरथर।
अंहकार मज वाहते तव चरणावर।।२।।
तूच चालविसी मम जीवन।
साद घालते मी अंतरातून।
आणसी सर्व जग फिरवून।
तूच चढविशी हात धरुन रे गडशिखर।।3।।
नको अंत पाहू आता दत्त अवधूता ।
तव आठवणीने कंठ येई दाटून ।
उघडूनिया लोचने बघ क्षणभर।
अंतरी हृदयाशी धर रे निरंतर।। ४।।
दिनदयाळ माझ्या गुरुराया।
करी मजवरती रे दया।
सर्व इच्छा मम अंतरीच्या ।
साध्य होण्यास करी दया या दिनावर।।५।।
दत्तराया तव दर्शनाची लागे हुरहूर
आस दावूनी न सोडशी वाऱ्यावर
मनी नामाचा खेळीन रे खेळ बरोबर
माझी सर्व भिस्त असे तुजवर।।६।।
श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ
12)
श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ
नित्य मुखी असू द्यावे नाम
चित्त राहो स्वामीपदी कायम
नेत्री दिसावे सदा समाधान
घडावी स्वामीसेवा हातून
स्वामीदत्त माऊली पाहून
सदैव भान जाई हरपून
अलगद बाहेर येई मुखातून
दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा
मंत्र असे हा सर्व भजण्या गुरुवरा
संकट दूर होऊन मार्ग मिळेल खरा
आशिर्वाद द्यावा जन्मदिनी लेकरा
श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ
13)
श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय शंकर
हे शंकरा मनी वसती करा
करुनी कृपादृष्टि दिनावरी
धाव धाव रे झडकरी सत्वर
मायामोहबंधनाचा पडो विसर
शंकर शंकर नाम शुभंकर
मनातून आले अलगद बाहेर
वाटे तुझ्यातच मी निरंतर
विलिन होऊन जाते पळभर
नाम शंकर मज आधार
हीच माझी खूण खरोखर
याजन्माची भेट आपुली
चांगल्या कर्मांची यादगार
हरीहर असती महाराज शंकर
वरुन दिसती एकदम कठोर
अंतरी लोण्याहून प्रेमळ शक्कर
भक्तावर त्यांची घारीची नजर
गिरनारी भेटती दत्त-शंकर
तेजाचा प्रकाश हा सभोवार
दिपून जाई मन होई उध्दार
साक्षीला असती कडेकपार
साद घाले मज गुरुशिखर
गुरुचरणा भेटाया आतूर
कृपा करावी स्वामी मजवर
आळविते तुज स्वामीशंकर
नमो नमो गुरु स्वामी मंगेशा
कर्ताकरविता तूच यतिवर
तुज अर्पिते कवनांचे भांडार
गोड मानूनी घ्यावे सत्वर
नतमस्तक मी तव चरणावर
श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय शंकर
14)
श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय शंकर
श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ
तुझे नाम घेता येतो जीवनी अर्थ
तुझा ध्यास चित्ती जीवा लागे ओढ
क्षणोक्षणी झेप घेई तुझ्यामागे मन
गुरु हा विसावा असे शिष्योत्तमाचा
गुरुवीण मार्ग दाखवी कोण उपासनेचा
जिथे पहावेे तिथे वसती स्वामीराजा
त्रिगुणात्मक त्रैमूर्ती रुपी दत्तराजा
तारी तारी मज भवसागरातून आज
रोमारोमात भिनू देे नामाचा आवाज
अंतरंगात फिरुनी जवळी घेई स्वामी
मनीचे जाणसी तू है बडा अंतर्यामी
नरसिंह सरस्वती श्रीपादवल्लभ दत्ता
सर्वकडे तुझी चालतसे अमर्याद सत्ता
नामासंगे सत्कर्म करत राहावे आपण
भक्तीची जोड देऊन सोडावे मीपण
स्वामी विठ्ठल स्वामी राम मुखी घ्यावे
मातापित्यांशी चार शब्द गोड बोलावे
विठ्ठल नामाने दुमदुमत राही पंढरी
खरा विठ्ठल वसे दिनदुबळ्या अंतरी
जो दोन घास तयांना आदरांने देत
उपासतपास न करता पडे पुण्य पदरात
जाणा हो तुम्ही सुचविलेले स्वामींनी शब्द
आनंदे भोग भोगून संपवण्या असे हे प्रारब्ध
दिनरात स्वामीनामासंगे सेवेची संगत
करी समर्पण ठेवी माथा चरणी मी
एक शरणागत.
श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय शंकर
15)
श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय शंकर
गुरुकृपेचा ध्यास
मज लागली आस
काय होई नकळे
आज या जीवास
माझे पुण्य फळले
ध्यानी मनी स्वप्नी
गुरुचरण दिसता
मन आनंदले
स्वामी नामाची
मज लागे तहान
एक क्षण न राही
गुरु नामावीण
स्वामीच विष्णू
स्वामीच शंकर
स्वामीच ब्रम्हा
माझे दत्त योगीश्वर
याहो याहो स्वामी
माझ्या मन मंदिरात
शब्दांची कुसुमे अर्पिते
राहू द्यावे मज तव छायेत
स्वामी तुमचे आशिष
असू द्यावे सर्वांवर
अंतरीची खूण पटता
स्वामी दिसती सभोवार
एकच मागणे स्वामी
प्रपंचातून परमार्थ
द्यावा मज साधून
त्यातूनच न्यावे उध्दरुन
श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय शंकर
16)
श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय शंकर
जेव्हा शांत मन होते अशांत |
आठवावे मनी श्री गुरुदेव दत्त |
स्थिर राहूनी करता एकचित्त |
सुचतील सुंदर मार्ग त्वरित ||१||
अंतरी स्मरण करता गुरुचे।
नाम मुखात येई सदा त्याचे।
परिसीमा गाठीता भक्तीची।
अस्तित्व जाणवे सद्गुरुचे।।२।।
नित्य राही जो गुरुच्या सेवेत।
त्यास संसारी ताप न बाधत।
येता जाता पहावे साक्षी भावे।
मग गुरुची साथ सदा जाणवे।।३।।
गुरु सांगती कानी गुपित
शिष्यास पाजती ज्ञानामृत
समजूनी देती जीवनसत्य
गुरुशिष्याचे नाते अलौकिक।।४।।
दत्त दत्त नाम सदा वदता
स्वामीदत्तगुरुंना शरण जाता
खेचून नेऊन ते सेवेकरीता
मम जीवाचे लाड पुरवितात।।५।।
असे हे स्वामीगुरुंचे देणे
मनात त्यांच्यामध्ये रमणे
ईच्छा असे सदा मानसी
नामात रंगूनी एक दिवस
त्यांच्याचरणी विलिन होणे।।६।।
दर्शन घेण्या जाता अवचित
देती स्वामी प्रसाद मठात त्वरित
मिळे देवीच्या आरतीचा मान
वाढदिवशी प्रसन्न करी मम जीवन
सुचलेली ही कवने तवकृपेने
अर्पिते मी तव चरणी आज।।७।।
श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय शंकर
17)
श्री गुरूदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय शंकर
जय दत्तगुरू गिरनारी।
करी दत्तशिखराची वारी|
दत्त कृपा असे ज्यावरी |
चढे तो दशसहस्त्र पायरी॥१॥
अहंपणा मनीची टाकून।
ठेवी चरणावर मस्तक।
मगच चढू शके गुरुभक्त।
एक एक पायरी सलग॥२॥
टाकता भार पूर्ण गुरूवर।
नेई पकडोनी अलगद वर|
दत्त दत्त नाम मुखात अखंड।
सोडून टाकावे सर्व बंध॥३॥
चढताना उभे शिखरी।
अंगात येई शिरशिरी।
नाद घुमे जय गिरिनारी।
चढे मग पाच हजार पायरी||४||
हात धरोनि तोच चालवत|
अंबामातेच्या दरबारी पोचवत|
नकळे कोणी शक्ती अद् भूत।
भारावून मन गर्जे अवधूत||५||
तिथून पुढे गोरक्ष पठार।
कसोटीचा क्षण असे तयार|
वारा डरकाळी फोडी करी जोर|
नाथांना नमन कराया न राही स्थिर||६||
मन गुरूचरणी दर्शना ओढ घेत|
मग थकण्याचा विसर पडत|
तेजस्वी कोमल गुरूचरण दिसता।
गुरू शिष्य तत्व एकरुप होत||७||
चहूकडे उभे दिसती गुरुराज।
नयनातून भक्तीमय आसू झिरपत|
भान हरपून आनंदाने मी म्हणे नाचत।
अवधूत अवधूत अवधूत श्री गुरुदेव दत्त||८||
श्री गुरूदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय शंकर
18)
श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय शंकर
त्रिगुणी तत्व अवतरले |
मज दत्तराज दिसले |
मन आनंदे नाचले |
अंतरी गहिवर दाटले |
श्रीदत्तगुरु स्वामी शंकर पाहिले||1||
किती दिसे रुप मनोहर |
आत्मानंदे भरतसे ऊर |
मनभोर विभोर जाहले |
आसमंत धुंदसुगंधित झाले |
श्रीदत्तगुरु स्वामी शंकर पाहिले ||2||
स्वामी स्वरूप माझे दैवत |
ध्यानी सदा मी त्यास पाहत |
मन सदा दत्तस्थानी रमले |
गुरुस्तुतीत आत्मसुख लाभले |
श्रीदत्तगुरु स्वामी शंकर पाहिले||3||
शंकर स्वरुप स्वामी दत्त सुंदर |
आठव येता मनी मिळे उत्तर |
ब्रम्हांडी भरुन स्वामीनाम उरले |
शंकर दत्त चित्ती स्थिरावले |
श्रीदत्तगुरु स्वामी शंकर पाहिले||4||
नाम चैतन्यरुपी ओतप्रोत भरले |
मज सदा दत्तरुपी आधार लाभले |
शक्तीमय होता देह मन भारावले |
प्रपंची भार उठाया मन सिध्द जाहले |
श्रीदत्तगुरु स्वामी शंकर पाहिले ||5||
साष्टांग नमन पदकमली निरंतर |
जाणून घेई भावना तू सत्वर |
नकोच देऊ मज कधीरे अंतर |
हाक मारता मार्ग दावी तव पाऊले |
मनःशांती मिळूनी धन्य धन्य झाले |
श्रीदत्तगुरु स्वामी शंकर पाहिले ||6||
श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय शंकर
19)
श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ
उठी उठी बा श्री स्वामीराया
नरसिंह सरस्वती दत्तात्रया
प्रभात समय हा पातला
उघडी नयन दयाळा ईश्वरा।
वाट पाहती नरनारी
पूजा कराया लवकरी
पक्षी किलबिल करुनी
जागवती तुजसी गुरुवरा।
दिशा फाकूनी रंग बदलती
नभात दिसे मस्त रंगसंगती
पूर्वेकडूनी उगवती रविराज
दर्शन घ्याया तुझे गुरुदेवा।
तिमिराचे हे जाळे सुटले
प्रकाशाचे साम्राज्य आले
देह तेजातून चमकून येई
एक भक्तीची लाट गुरुनाथा।
दशदिशा ओवाळती आरती
सर्वकडे तुझीच करती स्तुती
ब्रम्हांडी असे गजर नामाचा
श्री स्वामी समर्थ नमो गुरुराज।
दत्त दत्त नाम वाचे वदावे
तारक मंत्रा नित्य आठवावे
रोमारोमातून भरून घ्यावे
झाले मी स्वामीमय आज गुरुमूर्ते।
स्वामी राज तू दत्तमाऊली
ठेवी भक्तांवर कृपा सावली
मनातल्या हया भावविश्वातील
शब्दांची माला अर्पण तुज गुरुमाय।
श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ
®वैशाली कुळकर्णी.
20)
श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय शंकर
जय जय शंकर
असे योगीश्वर
भक्तीने स्मरता
धाव घेई निरंतर
चरणी मन स्थिर
प्रेमे पाही नजर
कसा कुठे कधी
देसी प्रसाद सत्वर
भक्ती प्रेम सागर
नामाला आला पूर
आणखी काय मागू
भरी मनःशांतीची घागर
देह असे हा नश्वर
ध्यानी ठेवी ईश्वर
राही माझ्या हृदयी
घालवी मम अहंकार
पाठीराखा गुरुवर
पांघरी मायेची चादर
मुखात राहू दे सदा
जय जय स्वामी शंकर
अज्ञानी प्रवास दूरवर
मज सोसवेना भार
काय करु सांगा आता
तव चरणी पडो हे शरीर
श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय शंकर
वैशाली कुळकर्णी
21)
No comments:
Post a Comment